Wednesday, May 21, 2025
डायरीतल्या कविता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_आठवांचा झुला..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
तुझ्या आठवांचा झुला
झाला आभाळात खुला
चांदण्यांनी हाती दिला
टोप चंदेरी हा फुला!
आठवणी चांदण्याच्या
आल्या दाटून हृदयी
सांग डोळे का गं ओले
झाले तुझे आज सई!
मीही मातीचा बाहुला
आहे मृगात भिजला,
ज्याचा देह आठवांनी
नाही जराही झिजला!
पण मन धावू पाहे
दूर पाऊस धारांत,
अन् ओल्या काजळाने
दुःख गेले अंधारात!
*©शशी त्रिभुवन अस्तगाव (अहिल्यानगर)*
*चलभाष:7066765927*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_असा वळीव धिंगाणा..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
वळीवाच्या येता धारा
धरा झाली आसुसली,
वादळाच्या तडाख्याने
झाडे मुकाट बसली!
कोटरात पाखरांची
पिल्ले घाबरून जात,
चिमुकल्या चोचीतून
त्यांना भरलेला वात!
कडाडती विजा जणू
ढोल ताशा वाजविती,
जमिनीला भिडण्याची
त्यांना घाई झाली किती!
ओठ लांबोडे करून
बाता सुरू म्हाताऱ्यांच्या
मोजतात पावसाळे
वळकट्या पथाऱ्यांच्या!
असा वळीव धिंगाणा
त्याची वर्णू काय ख्याती,
थेंब कानी कपाळी नि -
थोडे जपू चला हाती!
*©शशी त्रिभुवन, अस्तगाव (अहिल्यानगर)*
*चलभाष:7066765927*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_हंगामाची हिरव्या ..!_*
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖
आभाळ आज खाली आले हसली धरणी,
आनंदाची ओंजळ भरली अद्भुत करणी!
किती ढेकळे माय भुईची उत्सुकलेली..
पाऊसधार खेळत आहे तिच्याच चरणी!
वळीव पाहुणा चार दिसांचा लागे नाचू
हंगामाची हिरव्या झाली पायाभरणी!
देहावरती नवी पालवी नाचत राहुन..
वसुंधरा ही पुन्हा नव्याने होई तरणी!
कोंदट सारे मनाआत जे डाचत आहे
वाहत जाई अंगिकारून विचारसरणी!
*©शशी त्रिभुवन अस्तगाव (अहिल्यानगर)*
*चलभाष:7066765927*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment